वीज समस्यांवर आढावा बैठक उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी), शहरातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. 

शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, लोमकळलेल्या व तुटलेल्या वायरी, जीर्ण वीज खांब, कमी क्षमतेचे रोहित्र, तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत विविध प्रभागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील वीज समस्या मांडल्या त्याला अनुसरून नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश देत शहरातील वीज समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावी आणि प्रत्येक प्रभागातील समस्या निश्चित कालबद्ध आराखड्यानुसार सोडवाव्यात, असे सांगितले.

तसेच शहरातील वीज व्यवस्थेचा सविस्तर आराखडा तयार करून आवश्यक कामांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

यावेळी नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी वीज खांबांचे स्थलांतर करणे, लोमकळलेल्या वीजवाहिन्या उंच करणे, गरजेनुसार नवीन वीज खांब उभारणे, कमी क्षमतेच्या ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे, झाडांच्या फांद्यांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करणे, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. 

शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण विभागाने समन्वयाने काम करून प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीस उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, महावितरणचे सहाय्यक अभियंता धम्मपाल म्हस्के, नगरसेवक रउफ बागवान, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, राजश्री निकम, जुम्मा खा पठाण, इम्रान शेख (गुड्डू), सुधाकर गायकवाड, किशोर अग्रवाल, अशोक बन्सोड, शेख बाबू, शेख मोहम्मद कय्यूम, सुनील दुधे, रईस पठाण, अकील वसईकर, सत्तार हुसेन, शेख बाबर, डॉ. फिरोज पठाण, गौरव सहारे यांच्यासह नगर परिषदेचे संबंधित अधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.